२२ जानेवारी २०२४ हा दिवस हिंदू धर्माच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. हिंदू लोकांसाठी तो एक अभुतुर्व दिवस असेल. कारण या दिवशी खूप वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्या नगरी मध्ये प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार आहे. अयोध्या राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शेवटच्या टप्प्यात आहे. संपूर्ण जगातील हिंदू लोकांसाठी हा एक ऐतिहासिक दिवस मानला जाईल. अयोध्येतील राम मंदिराची रूपरेखा पूर्णपणे तयार झाली आहे.
१५ जानेवारी २०२४ ते २२ जानेवारी २०२४
१५ जानेवारी : मकर संक्रांतीच्या दिवशी रामलल्ला म्हणजेच प्रभू श्री राम यांची बालरूप मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन करण्यात येणार आहे.
१६ जानेवारी : या दिवशी रामाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधी सुरु होतील.
१७ जानेवारी : या दिवशी रामाच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यता येईल.
१८जानेवारी : या दिवसापासून अभिषेक व विधी इतर विधी सुरु होतील. प्रवेश पूजा, वास्तू पूजा, वरूण पूजा आणि विघ्नहर्ता गणेश पूजा होतील.
१९ जानेवारी : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे.
२० जानेवारी : रामाच्या मंदिराचा गाभारा ८१ कलशांनी पवित्र केला जाईल. ज्यात विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे. वास्तूशांती विधी होईल.
२१ जानेवारी : या दिवशी यज्ञ विधी मध्ये विशेष पूजा आणि हवन होईल. या दरम्यान श्री राम यांना १२५ कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल.
२२ जानेवारी : या दिवशी मध्य काळात मृगशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे.
अयोध्या राम मंदिर लोकार्पण निमंत्रण पत्रिका
२०२४ हे नवीन वर्ष सुरु होताच आपले राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होणार आहे . या समारंभासाठी देशातील तसेच प्रत्येक क्षेत्रातील नावाजलेल्या लोकांना आमंत्रित केले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याइतकीच खास त्याची निमंत्रण पत्रिका आहे.
निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावर राम मंदिराचे सुंदर चित्र आहे. त्यात डाव्या बाजूला हनुमान आहे. आणि उजव्या बाजूला हनुमानाच्या गदेचे चित्र आहे. ते लॉक च्या स्वरूपात आहे. हे लॉक फिरवल्यावर पत्रिका उघडते. ही सुंदर पत्रिका एका भगव्या रंगाच्या पाकिटात दिली जाणार आहे. निमंत्रण पत्रिका जेव्हा आपण उघडतो तेव्हा प्रथम पृष्ठावर प्रभू श्री राम यांचा सुंदर फोटो दिसतो. त्या सोबतच माता सीता, लक्ष्मण , भरत, शत्रुघ्न आणि रामाचा परम भक्त हनुमान आहे. हा फोटो मनाला मोहून घेणारा आहे.
निमंत्रण पत्रिकेच्या दुसऱ्या पानावर अयोध्येच्या माती विषयी महत्व सांगितले आहे. त्यात असे लिहिले आहे की देवी देवतांचा अयोध्येत निवास असल्याने तेथील माती श्रेष्ठ मानली गेली आहे. प्रभू श्री रामांचा त्या माती मध्ये अजून वास आहे असे मानले जाते. तेथील मातीत दैवी ऊर्जा आहे, जी भक्तांच्या मनात श्री रामांबद्दल श्रद्धा आणि भक्ती जागृत करते. हीच माती भक्तांना भेट म्हणून दिली जाणार आहे. याच पानावर पुढे रामचरित्र मानस मधील चौपाई आणि त्याचा सार दिलेला आहे. येणाऱ्या पिढीसाठी राम, रामायण आणि राम चरित्र या बद्दल ज्ञानाचा भंडार उपलब्ध करून देण्यासाठी एक AI एप्लिकेशन बनवणार असल्याची चर्चा आहे. या अप्लिकेशन द्वारे वयस्कर लोकांना देखील आपल्या धर्माबद्दलचे गहन प्रश्न असतील त्याचे उत्तर मिळणार आहे.
निमंत्रण पत्रिकेच्या तिसऱ्या पृष्ठावर राम चरित्र मानस मधील चौपाई एका कार्ड वर लिहिली आहे. त्या सोबतच एका काचेच्या छोट्या डब्बीत अयोध्येची माती ठेवलेली आहे. याच बरोबर एक छोटा तांब्याचा शिक्का आहे ज्याच्या एका बाजूला श्री रामांचे चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिराचे चित्र आहे.
सर्व धर्मातील साधू संतांना निमंत्रण
प्रभू श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चार हजार संतांना आमंत्रित केले गेले आहे. ट्रस्टचा असा प्रयत्न आहे कि प्रत्येक धर्मातील साधू संतांना या सोहळ्यात सहभागी करता यावे. चारही शंकराचार्य, महामंडलेश्वर, हिंदू मठांचे प्रमुख , शिख आणि बौद्ध धर्मातील प्रमुख संतांना आणि नेत्यांना यात निमंत्रित केले गेले आहे. याचबोरबर विविध क्षेत्रातील अनेक नावाजलेल्या व्यक्तींना देखी ल निमंत्रित केले आहे जसे कि क्रिकेटपटु , अभिनेते , उद्योगपती , न्यायाधीश , शास्रज्ञ , लेखक, कवी आदि. ट्रस्ट च्या वतीने एकूण ७ हजार व्यक्तींना निमंत्रण पाठविले आहे त्यात ३ हजार अतिमहत्वाचे आहेत आणि ४ हजार द्रष्टे आहेत.
मोदींचे सर्व भक्तांना आवाहन
देशातील १४० कोटी जनतेने श्री राम ज्योत प्रज्वलित करून हा दिवस दिवाळी सारखाच साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे . करोडो हिंदू भक्तांचे अनेक वर्षांचे स्वप्न अयोध्येत साकार होत आहे. देशांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या नगरीतील श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. एक प्रदीर्घ लढा सफल होत आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा हा एक ऐतिहासिक प्रसंग असून आपल्या सर्वांचे भाग्य थोर कि आपण सर्व याचे साक्षीदार होणार आहोत.